कागल पाझर तलाव परिसराला अधिकाधिक पर्यटक भेट देतील; अजित पवार
schedule12 Aug 24 person by visibility 273 categoryलाइफस्टाइल

कागल नगरपरिषदेच्या वतीने पाझर तलाव या ठिकाणी बांधण्यात आलेला पादचारी मार्ग, संगीत कारंजा, कृत्रिम धबधबा व बोटिंग क्लबचे तसेच महात्मा फुले मार्केट येथील मटण, चिकन व फिश, व्हेजिटेबल मार्केटच्या नवीन इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, राधानगरी कागल विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, नगरपालिका प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कागल येथे 13 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीतून पाझर तलाव परिसर सुशोभित करण्यात आला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्याजोगे आल्हाददायक वातावरण निर्मिती या परीसरात करण्यात आली आहे. तलावाच्या काठावर छोट्या कार्यक्रमांसाठी लॉन, तलावात बोटिंग, म्युझिकल फाउंटन (संगीत कारंजा), कृत्रिम धबधबा तयार करण्यात आला आहे. पाझर तलाव परिसर पर्यटकांसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत खुला राहणार आहे.
तसेच 15 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या मटण, चिकन, फिश, व्हेजिटेबल मार्केटच्या नूतन इमारतीत 93 गाळे आहेत. या सुसज्ज अशा महात्मा फुले मार्केटमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली आहे. याठिकाणी पार्किंग व अग्निशमन व्यवस्था करण्यात आली आहे.